


पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे मागणी

पिंपरी चिंचवड, ता.२२ जुलै २०२५: पिंपरी चिंचवड शहरात चित्रित झालेला आणि स्वच्छता, आरोग्य, नागरिकांची सामाजिक जबाबदारी तसेच सफाई कामगारांच्या योगदानावर आधारित “अवकारीका” हा चित्रपट दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता व प्रमुख कलाकार हे सर्वच पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक नागरिक असून या चित्रपटाचे स्थानिक व सामाजिक महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. धम्मराज साळवे यांनी व्यक्त केले आहे.
अॅड. साळवे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व अतिरिक्त आयुक्त १, २, ३ यांना निवेदन देत मागणी केली आहे की, या चित्रपटाचे मोफत प्रेक्षण महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांना उपलब्ध करून द्यावे.
या मागणीच्या अनुषंगाने पुढील तीन प्रमुख सुचना सुद्धा त्यांनी प्रशासनाकडे मांडल्या:
मोफत प्रवेशाची विशेष व्यवस्था – पालिकेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी व सफाई कामगारांसाठी नामनिर्दिष्ट चित्रपटगृहांमध्ये विशेष स्क्रीनिंग किंवा प्रवेश पास/तिकीट दिले जावेत.
सामाजिक जनजागृती – जनसंपर्क विभागामार्फत या चित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छता व नागरिक जबाबदारीबाबत प्रचार व प्रोत्साहन द्यावे.
स्थानिक कलाकारांना पाठिंबा – अशा सामाजिक विषयावरील चित्रपटांना प्रोत्साहन देऊन शहरातील कलावंतांना पाठबळ द्यावे.
या उपक्रमामुळे स्वच्छ भारत अभियान, कर्तव्यनिष्ठा आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांना चालना मिळेल व पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण होईल, असा विश्वास अॅड. साळवे यांनी व्यक्त केला.
अॅड. धम्मराज साळवे, वरिष्ठ उपाध्यक्ष – पिंपरी चिंचवड शहर,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️