


- सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांची प्रतिक्रिया
- नाशिक फाटा ते खेड कोंडी सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार
पिंपरी-चिंचवड, ता. १२: पिंपरी चिंचवड शहरातील तसेच हिंजवडी आयटी पार्क या भागात या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवलेल्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सोसायटी फेडरेशन आणि हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवड शहरातील स्वयंसेवी संस्थांची बैठक आयोजित करावी, अशी विनंती आमदार महेश लांडगे यांना फेडरेशनने पत्राद्वारे केली होती.

त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे सोसायटीधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, अशी प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी व्यक्त केली आहे.
शहरातील सर्वच भागातील सोसायटीधारक नागरिक, हिंजवडी आयटी पार्क या भागामध्ये नोकरी व्यवसाय निमित्त जात असताना त्यांना तासाने तास ट्राफिक मध्ये अडकून पडण्याचा भयंकर त्रास होत असल्याबाबत मुख्यमंत्री महोदयासमोर व्यथा मांडल्या. त्याचप्रमाणे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याची विनंती देखील केली.
चांदणी चौक या ठिकाणी पाठीमागे निर्माण झालेल्या ट्राफिकच्या समस्येवर देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एनएचएआय याची एक टीम तयार करून या टीमने तयार केलेल्या अहवालातील त्रुटी दूर करण्यासाठी आयआयटी मुंबई यांची मदत घेऊन ज्याप्रमाणे प्रपोजल तयार केले होते. त्याच धरतीवर पिंपरी-चिंचवड शहरातील या सर्व ट्राफिकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही करता येईल का? याबद्दल मीटिंगमध्ये लक्ष वेधले.
तसेच इतर काही तत्कालिक आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात याबद्दल विनंती आणि उपाय सुचवले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या आणि उपाय ऐकून घेऊन मीटिंगमध्ये उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना योग्य ते सूचना देऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
तसेच, नाशिक हायवेवरील चाकण, खेड त्याचप्रमाणे निगडी, चिखली मोशी या परिसरातील ट्राफिक समस्या सोडवण्यासाठी देखील कायम स्वरुपी उपाययोजना करण्याकरिता रस्ता रुंदीकरणाचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री यांना केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वप्रथमच एखाद्या शहरातील स्वयंसेवी संस्थांना एखाद्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, उपाययोजना आणि चर्चा करण्यासाठी बोलवल्याची ही घटना आहे. आता नाशिक फाटा त्याचप्रमाणे देहू, आळंदी रोड, चिखली भागातील रोडवरील ही वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी अपेक्षा आहे.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️