


पावसाच्या पहिल्या थेंबाबरोबर उभ्या महाराष्ट्राला कोणते वेद लागत असतील तर ते म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारीचे. पेरणी उरकली आणि पेरलेलं उगवून येईपर्यंत काय करायचे तर पंढरपूरची वारी करायची असा महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा नित्यनेम आहे.

वारी ही महाराष्ट्राची आणि पंढरपूरच्या पांडुरंगाची ‘महाउपासना’ आहे. हे म्हणण्याचं कारण असं आहे की, ज्या गावात एखादी एसटीही जात नाही, ज्या गावात नीट रस्ता नाही अशा गावांतून किमान एक तरी अशी व्यक्ती असते की, जी पंढरीची वारी करण्यासाठी वारीला येते.
वारी म्हणजे काय तर, आपली जी इष्ट देवता असते त्या देवतेच्या दर्शनाला एखाद्या विशिष्ट तिथीला जाणं.
मग, कुणी म्हणतं की मी कोल्हापूरच्या अंबाबाईची वारी केली, कुणी म्हणतं की मी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची वारी केली, कुणी म्हणतं की मी जेजुरीच्या खंडोबाची वारी केली. संत एकनाथ महाराज एका अभंगात असं म्हणतात की, “मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी” काही लोक याचदरम्यान शिर्डी साईबाबांची देखील वारी करतात. म्हणजेच आपल्या इष्ट देवतेची वारी करणे होय.
अशा अनेक गोष्टी आपल्याला अनेक देवतांच्या दिसतात. मात्र तरीही ‘वारी’ हा शब्द आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आला की आपल्याला पंढरीचीच वारी आठवते. इतकी लोकप्रिय पंढरीची वारी आहे.
वारी म्हणजे मी आपल्याला अगोदर सांगितले की, आपल्या एखाद्या इष्ट देवतेला एखाद्या विशिष्ट वेळेला, तिथीला भेटायला जाणे आणि त्या वारीमध्ये सर्वात विशेष लोकप्रिय वारी म्हणजे कुठली असेल तर ती आहे आषाढी एकादशीची वारी.
आषाढ शुद्ध एकादशीला ज्या एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ असंही म्हटलं जातं. लाखो वारकरी या दिवशी पंढरपूरला एकत्र जमा झालेले आपल्याला दिसतात. या एकादशीला महाराष्ट्रातील सर्वात मोठी वारी म्हटलं आहे. ज्याअर्थी एकादशीची वारी मोठी असते, त्याअर्थी इतरही छोट्या वारी आहेत. वारकरी संप्रदायामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या वारी आहेत.
एक म्हणजे संतांची वारी व दुसरी म्हणजे देवाची वारी. दर महिन्याच्या पहिल्या एकादशीला म्हणजेच शुद्ध एकादशीला पंढरपूरला जाणं चंद्रभागेमध्ये स्नान करणं, देवाचं दर्शन घेणे, नगर प्रदक्षिणा घालणं, पुंडलिकाचे दर्शन घेणे ही झाली देवाची वारी तर संतांची वारी म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत निळोबाराय, संत मुक्ताई, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी, संत एकनाथ, संत नामदेव, संत बहिणाबाई, आदी संतांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन घेणे आणि नामस्मरण करणे म्हणजे संतांची वारी होय. काही
वारकरी हे असेही असतात की, जे महिन्याच्या पहिल्या एकादशीला पंढरपूरला जातात व दुसऱ्या एकादशीला ते पंढरपूरहून पायी चालत चालत आळंदी व देहू या संतांच्या गावी जातात व पुन्हा पंढरपूर पर्यंत चालत जातात अशा वारकऱ्यांना महिन्याचे वारकरी म्हटलं जातं.
आता सगळ्यांनाच महिन्याची वारी करणे शक्य होत नाही. म्हणून वारकरी संप्रदायात चार महत्त्वाच्या वाऱ्या आहेत. चैत्र वारी, माघ वारी, कार्तिकी वारी आणि आषाढीची वारी या चार वाऱ्या कमीत कमी सर्वांनी कराव्यात अशी भावना वारकरी संप्रदायामध्ये आहे. या चारही वाऱ्या करायला जमल्या नाही तर किमान यापैकी एका तरी वारीला जायला पाहिजे. म्हणून आषाढी वारीला महाराष्ट्रातून अनेक वारकरी येत असतात.
आषाढी वारी वगळता इतर वाऱ्या करताना ही सर्व मंडळी आपापल्या गावाहून पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन वारी पूर्ण करतात. मात्र आषाढ महिन्यातील आषाढी वारीचे वैशिष्ट्य असे आहे की, ही सर्व वारकरी मंडळी संतांच्या सोबत नाचत, गात, खेळत आनंदाने पायी चालत पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जातात. आषाढी वारीदरम्यान जर आपण पाहिलं तर असं लक्षात येतं की, यादरम्यान पंढरपूरला भेट देणाऱ्या वारकऱ्यांची संख्या जवळपास दहा लाखाहून अधिक आहे.
आषाढी वारीमध्ये वारकरी वेगवेगळ्या संतांच्या सोबत, वेगवेगळ्या मार्गाने चालत पंढरपूरला जातात आणि भक्तीचा महोत्सव आषाढी वारीच्या रूपाने सुरू करतात. अशा वारीची उपासना करणारा जो असतो त्यास वारकरी असे म्हटले जाते. संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आशा वारकऱ्याचे वर्णन करताना असं म्हटलं आहे की, वारकरी या वारीत कायेने, वाचेने, मनाने आणि आपलं सर्व जीवन तसेच सर्वस्व उदार होऊन पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करतो. तो खरा पंढरीचा वारकरी, असं संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले आहे. अशी वारी करणारा वारकरी किंवा वारीकर होतो. पुढे ते म्हणतात की, वारकरी मंडळी देवाची वारी करणारी मंडळी आहेत.
आता हा मुद्दा पुढे येतो की मग ही वारीची परंपरा केव्हा सुरू झाली असेल. आपल्या सर्वांना नम्रपणे सांगतो की कै. मामासाहेब दांडेकर किंवा इतर अभ्यासक मंडळी या सर्व मंडळींनी याबाबतचे सर्व पुरावे किंवा नोंदी करून ठेवल्या आहेत.
त्यांच्या नोंदीनुसार संत ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील हे देखील पंढरपूरच्या पांडुरंगाचे वारकरी होते. त्यांचे आजी आजोबा देखील वारकरी होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे आठवे पुरुष विश्वंभर बाबा हे देखील वारकरी होते. त्यांच्या आई त्यांना नेहमी असं म्हणत की, आपल्या घरात वारीची परंपरा आहे.
आपल्या घरात वारी पूर्वापार चालत आलेली आहे. ती आपल्याला नित्यनेमाने पुढे न्यायची आहे. म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अगोदरपासून वारकरी संप्रदाय हा अस्तित्वात होता.या सोहळ्यात जीवावर उदार होऊन, “संपत्ती सोहळा ना आवडे मनाला, लागला टकळा पंढरीचा.” या ओळींप्रमाणे वारकऱ्याला संपत्ती आवडत नाही, ना कुठल्या गोष्टीचा मोह. आपल्या जवळचं सारं टाकून द्यायचं आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दिशेने एका विशिष्ट ओढीने चालत धावत जायचं. ही गोष्ट नितांत सुंदर आहे. निष्ठेची अनेक रूप आपल्याला पंढरीच्या वारीमध्ये पाहायला मिळतात.
पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची ‘महाउपासना’ आहे. म्हणून तर कोणीतरी असं म्हटलं आहे की एक तरी वारी अनुभवावी, जगण्याचा, निष्ठेचा, सेवेचा उदात्त अनुभव घ्यायचा असेल तर आषाढ महिन्यात विविध ठिकाणाहून निघणाऱ्या संतांच्या पालख्यांसमेवत एकदा तरी वारीचा अनुभव घेण्यासाठी सहभागी होण्यासाठी जायलाच पाहिजे. राम कृष्ण हरी…🚩😊🙏
एकनाथ भालेकर, राळेगणसिद्धी
संपर्क – 74480 77926
eknathbhalekar@gmail.com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️