


पिंपरी, ता. ११: देहूरोड धम्मभूमी वर्धापन दिनी दिनांक २५ डिसेंबर २०२४ तसेच ०१ जानेवारी २०२५ रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निम्मिताने आंबेडकरी अनुयायांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांनी दिली आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी आपल्या स्वहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची देहूरोड या ठिकाणी स्थापना केली होती.म्हणून आज त्या ठिकाणाला देहूरोड धम्मभूमी म्हणून ओळखले जाते.आणि तेंव्हापासून प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी देहूरोड धम्मभूमी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी देशभरातून व राज्यातून लाखो व पिंपरी चिंचवड शहरातून हजारो आंबेडकरी व बौद्ध अनुयायी अभिवादन करण्यासाठी देहूरोड धम्मभूमी या ठिकाणी जात असतात.
तसेच कोरेगाव भीमा या ठिकाणी देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ०१ जानेवारी १९२७ रोजी आपल्या सहकाऱ्यांसह १८१८ मधील झालेल्या लढाईचे प्रतीक कोरेगाव भीमा विजयस्तंभास भेट दिली होती.व या लढाईत लढलेल्या आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास सांगितला होता. तेंव्हापासून प्रत्येक वर्षी हा दिवस देखील कोरेगाव भीमा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो.
२०१८ नंतर झालेल्या हल्ल्यानंतर या दिनाला जागतिक दर्जाचे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ०१ जानेवारीला कोरेगाव भीमा जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांची संख्या आता ३५ ते ४० लाखांच्या जवळपास गेली आहे.या शौर्यदिना दिवशी १० ते १५ हजार अनुयायी पिंपरी चिंचवड शहरातून कोरेगाव भीमा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात असतात.
वरील दोन्ही ठिकाणी अनुयायी आपली स्वतःची वाहने घेऊन या ठिकाणी जातात..परंतु प्रत्येकानी स्वतःची वाहने नेल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या निर्माण होते.पोलीस आणि ट्राफिक यंत्रणेवर ताण निर्माण होतो.सर्व वाहतूक विस्कळीत होते त्यामुळे अनुयायांना आणि वाहतूक व पोलीस अधिकार्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
त्यामुळे प्रशासनाने दोन्ही ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा विचार करून आणि खाजगी वाहने टाळण्यासाठी प्रशासनाने पिंपरी ते देहूरोड धम्मभूमी व पिंपरी ते कोरेगाव भीमा या ठिकाणी जास्तीत जास्त मोफत बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून लोक खाजगी वाहनांपेक्षा बसेसने जातील आणि यामुळे एक शिस्त निर्माण होईल कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत.
सदर विषयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांना देण्यात आले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️