


पिंपरी चिंचवड, ता. २८: चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये समाजसुधारक, शिक्षणप्रणेत्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.

या निमित्ताने इयत्ता 2-अ च्या विद्यार्थ्यांनी “महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षणाचे धडे देण्यावर” आधारित प्रभावी नाटक सादर केले. या नाटकातून फुले दांपत्यांनी समाजातील महिलांना दिलेले शिक्षण, त्याग आणि कर्तृत्व यांचे मार्मिक चित्रण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या अभिनयाला उपस्थितांकडून भरघोस दाद मिळाली.
कार्यक्रमात शाळेचे संचालक श्री. संदीप काटे यांनी महात्मा फुलेंच्या शिक्षणप्रणाली, समाजोन्नती आणि समतेच्या विचारांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “महात्मा फुले यांनी दाखवलेला समानतेचा मार्ग आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे.”
शाळेच्या प्राचार्या सुविधा महाले यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषणात महात्मा फुलेंच्या कार्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगत त्यांचे क्रांतिकारक विचार शिक्षणात कसे अंगीकारता येतील यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक भान, सहिष्णुता आणि शिक्षणाबद्दल कृतज्ञता बाळगण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सांगता ही शाळेच्या शिक्षिका अश्विनी जोगदंड यांनी केली. महात्मा फुलेंचा विचार व प्रेरणा याला उजाळा देणारा हा उपक्रम सर्वांच्या मनाला भावला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
